भीमरुपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती ।वनारी अंजनीसूता, रामदूता प्रभंजना ॥ १ ॥
महाबळी प्राणदाता, सकळां ऊठवी बळें ।सौख्यकारी दुःखहारी, दूत वैष्णवगायका ॥ २ ॥
दीनानाथा हरीरुपा, सुंदरा जगदंतरा ।पातालदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ॥ ३ ॥
लोकनाथा जगन्नाथा, ।प्राणनाथा पुरातना ।पुण्यवंता पुण्यशीला, पावना परितोषका ॥ ४ ॥
ध्वजांगें उचली बाहो, आवेशे लोटला पुढे ।काळाग्नि काळरुद्राग्नि, देखतां कांपती भयें ॥ ५ ॥
ब्रह्मांडें माइली नेणों, आंवळे दंतपंगती ।नेत्राग्नि चालिल्या ज्वाळा, भृकुटी ताठिल्या बळें ॥ ६ ॥
पुच्छ तें मुरडिलें माथां, किरीटी कुंडलें बरीं ।सुवर्णकटिकांसोटी, घंटा किंकिणि नागरा ॥ ७ ॥
ठकारे पर्वताऐसा, नेटका सडपातळू ।चपळांग पाहतां मोठे महाविद्युल्लतेपरी ॥ ८ ॥
कोटिच्या कोटि उड्डाणे, झेंपावे उत्तरेकडे ।मंद्राद्रीसारखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें ॥ ९ ॥
आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती ।मनासी टाकिले मागें, गतीसी तुळणा नसे ॥ १० ॥
अणुपासोनि ब्रह्मांडायेवढा, होत जातसे ।तयासी तुळणा कोठे, मेरुमंदार धाकुटें ॥ ११ ॥
ब्रह्मांडाभोंवते वेढे, वज्रपुच्छे करूं शके ।तयासी तुळणा कैंची, ब्रह्मांडी पाहतां नसे ॥ १२ ॥
आरक्त देखिलें डोळां, ग्रासिलें सूर्यमंडळा ।वाढतां वाढतां वाढे, भेदिले शून्यमंडळा ॥ १३ ॥
धनधान्य पशुवृद्धि, पुत्रपौत्र समग्रही ।पावती रुपविद्यादि, स्तोत्रपाठेंकरुनियां ॥ १४ ॥
भूतप्रेतसमंधादि, रोगव्याधि समस्तही ।नासती तुटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ॥ १५ ॥
हे धरा पंधराश्लोकी, लाभली शोभली भली ।दृढदेहो निसंदेहो, संख्या चंद्रकळागुणे ॥ १६ ॥
रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू ।रामरुपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ॥ १७ ॥
॥ इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं श्री मारुतिस्तोत्रं संपूर्णम् ॥
साइन इन केल्यावर सर्व उपकरणांवर वाचनाची जागा जतन होते, भावार्थ पाहता येतो, रोजचे वाचन नोंदवता येते आणि निवडलेली स्मरणे मिळतात.