पोथी
←

श्री गजानन विजय ग्रंथ

अध्याय ९

अध्याय ९

अध्याय ९

अध्याय नववा

श्रीगणेशाय नमः ॥

हे सगुणस्वरूपा रुक्मिणीवरा । हे चंद्रभागातटविहारा । श्रीसंतवरदा शारंगधरा । पतितपावना दयानिधे ॥ १ ॥

लहानांवाचून मोठ्यांचा । मोठेपणा न टिके साचा । पतिताविण परमेश्वराचा । बोलबाला होणे नसे ॥ २ ॥

आम्ही आहोत पतित । म्हणून तुला म्हणतात । पावनकर्ता रुक्मिणीकांत । हे आतां विसरु नको ॥ ३ ॥

परिस लोहाला सोने करी । म्हणूनी त्याचे महत्त्व भूमीवरी । ओहोळ पोटी घे गोदावरी । म्हणून म्हणती तीर्थ तिला ॥ ४ ॥

याचा विचार करावा । चित्तीं आपुल्या माधवा । दासगणूला हात द्यावा । बुडूं न द्यावे कोठेंही ॥ ५ ॥

असो, गोविंदबुवा टाकळीकर । एक हरिदास होता थोर । तो कराया कीर्तन-गजर । शेगांवासी पातला ॥ ६ ॥

तेथे शिवाचे मंदिर । पुरातन होते साचार । ज्याचा केला जीर्णोद्धार । मोटे नामक सावकारें ॥ ७ ॥

अलिकडच्या श्रीमंताला । मंदिरांचा कंटाळा । मोटारी-क्लब-बायसिकलला । याचें प्रेम बहू असे! ॥ ८ ॥

तैसा न मोटे सावकार । श्रीमंत असून भाविक फार । त्यानेच हा जीर्णोद्धार । केला असे मंदिराचा ॥ ९ ॥

म्हणोन मोट्यांचे मंदिर । वदूं लागले नारी-नर । आतां पुढचा प्रकार । काय झाला तो ऐका ॥ १० ॥

त्या मोट्यांच्या मंदिरी । उतरले टाकळीकर कथेकरी । त्यांचा घोडा समोरी । बांधला होता मंदिराच्या ॥ ११ ॥

घोडा अती द्वाड होता । कोणासही मारी लाथा । समोरून कोणी येता । त्यास चावे कुत्र्यासम ॥ १२ ॥

तोडी चऱ्हाटें वरच्यावरी । स्थिर न राहे क्षणभरी । कधी कधी कांतारी । त्याने जावे पळोन ॥ १३ ॥

खिंकाळे रात्रंदिवस । वाईट खोड्या बहुवस । आल्या होत्या मुक्कामास । श्रोते तया घोड्याच्या ॥ १४ ॥

लोखंडाच्या साखळ्या । होत्या त्यासी बांधण्या केल्या । त्या या समयीं राहिल्या । टाकळीमाजीं विसरून ॥ १५ ॥