अध्याय ८
श्रीगणेशाय नमः ॥
हे वसुदेव-देवकीनंदना । हे गोपगोपी मनरंजना । हे दुष्ट-दानव मर्दना । श्रीहरी पाव मातें ॥ १ ॥
तुझ्या प्राप्तीचे साधन । कर्मादिकांचे अनुष्ठान । परा भक्तीचे सेवन । करण्या आहे अपात्र मी ॥ २ ॥
तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारी । गीर्वाण भाषेंभीतरी । त्यांचे सांग करू हरी । सेवन ते कवण्या रीती ? ॥ ३ ॥
गीर्वाणाचा नसे गंध । त्यातून माझी मती मंद । कमलांतील मकरंद । बेडुकाला मिळतो कसा ? ॥ ४ ॥
अन्नदानें तुझी प्राप्ती । जरी करून घेऊं श्रीपती । तरी धनाचा अभाव निश्चिती । दारिद्र्य पदरी बांधले त्वां ॥ ५ ॥
जरी करूं मी तीर्थयात्रा । तरी सामर्थ्य नाहीं गात्रा । तशांतही अंधत्व आतां । आले आहे दृष्टीतें ॥ ६ ॥
ऐसा सर्व बाजूंनी । मी हीन-दीन चक्रपाणी । दारिद्र्याचे मनीच्या मनी । जाती जिरोनी मनोरथ ॥ ७ ॥
हे व्यावहारिक दृष्ट्या खरें जरी । परी तुझी कृपा झाल्यावरी । स्वानंदाच्या सागरी । पोहत राहे अहोरात्र ॥ ८ ॥
तुझ्या कृपेचे महिमान । आगळे आहे सर्वांहून । घनाच्या पाण्यालागून । दाम देण्याची गरज नसे ॥ ९ ॥
मेघांनी आणिल्या मनांत । तळी-विहिरी भरतात । निव्वळ खडकास फुटतात । पाट पाण्याचे, पांडुरंगा ! ॥ १० ॥
ऐशा त्या तंव कृपेचा । दासगणू हा भुकेला साचा । घास एखादा तरी त्याचा । घाल माझ्या मुखांत ॥ ११ ॥
तेणे मी तृप्त होईन । अवघ्या सुखातें पावेन । अमृताचा लाभता कण । रोग सारे दूर होती ॥ १२ ॥
असो, मागील अध्यायीं । देशमुख पाटलाठायीं । मुक्कामातें दुफळीबाई । येऊन बैसली हे ऐकिले ॥ १३ ॥
जेथ जेथ ही नांदे दुफळी । तेथ तेथ ही करी होळी । अवघ्या सुखाची रांगोळी । इच्या पायीं होतसे ॥ १४ ॥
क्षयरोग तो शरीराला । वा दुफळी रोग समाजाला । नेतसे यम सदनाला । प्रयत्न पडती लुळे तेथ ॥ १५ ॥