पोथी
साइन इन

श्री गजानन विजय ग्रंथ

अध्याय ७

अध्याय ७

अध्याय

अध्याय सातवा

श्रीगणेशाय नमः ॥

जय जयाजी राघवा रामा जय जयाजी मेघःश्यामा संतजनांच्या विश्रामा सीतापते दाशरथे

तुझ्या कृपेने वानर बलिष्ठ झाले भूमीवर ज्यांनी रावणाचा चक्काचूर केला देवा लंकेवरी

तुझी कृपा झाल्या पाही तो सर्वदा होतो विजयी जे जें इच्छील ते तें नेई काम आपले तडीला

भूपतीचा वशीला ज्यातें देवा लाधला तो वंद्य होतो दिवाणाला नीच कितीही असला जरी

ऐशा अमोघ कृपेला होईन कां मी योग्य भला याचा जों मी विचार केला तो ऐसे आले कळून

नाही ज्ञान, नाही भक्ती खरीखुरी हे श्रीपती ऐसी आहे माझी स्थिती शोचनीय पांडुरंगा

मन सदा आशाळभूत ते ना कदा स्थिर होत नाना विकल्प मनांत येऊ लागती वरच्यावरी

मग, ऐशा पातक्याला केवि लाधावा वशिला तुझा, सांग जगत्पाला हें व्यावहारिक म्हणणे असे

तुला आवडी पातक्याची मनापासून आहे साची ऐसी साक्ष पुराणाची आहे की दीनबंधो

पुण्यवानाचे तारण केल्या न कांही नवल जाण जो पातक्या लागून उद्धरीतसे तोच मोठा १०

या जगती तुझ्याहून मोठा नाही कोणी आन देवा मम पातकालागून किमपी आता पाहूं नको ११

रक्षी आपला मोठेपणा मज सांभाळी नारायणा दासगणू शरण चरणां आतां उपेक्षा करू नका १२

हा मारुतीचा उत्सव करीत होता अवघा गांव याचा पुढारी खंडेराव पाटील गणेश कुळीचा १३

हे पाटील घराणे जाण आहे अती पुरातन घरचे धन-कनक संपन्न पसारा थोर शेतीचा १४

पूर्वीपासून यांच्या घरीं संतसेवा होती खरी आली भाग्ये जमेदारी मग काय विचारितां ? १५