अध्याय ६
श्रीगणेशाय नमः ॥
हे परममंगला श्रीहरी । तुझी कृपा झालीयावरी । अशुभ अवघे जाते दुरी । हा अनुभव संतांचा ॥ १ ॥
त्या संतवाक्यी भरंवसा । मी ठेवून श्रीनिवासा । मंगलाची धरून आशा । तुझ्या दारी पातलो ॥ २ ॥
आतां विन्मुख लावल्यास । त्याचा तुला लागेल दोष । आणि, बट्टा वाक्यास । लागेल की संतांच्या ॥ ३ ॥
म्हणोन, हे माधवा ! । अभिमान माझा धरावा । रोष कधी ना करावा । या अजाण लेकरावर ॥ ४ ॥
बालकाचे हीनपण । मातेंलागी दूषण । हे मनांत आणून । करणे असेल ते करी ॥ ५ ॥
असो, बंकटलाला घरी । राहिली समर्थांची स्वारी । तयी अपूर्व एक घडली खरी । गोष्ट श्रोते ती ऐका ॥ ६ ॥
गांवाचिया दक्षिणेस । बंकटलालाच्या मळ्यांस । महाराज गेले एक दिवस । कणसें मक्याचीं खावया ॥ ७ ॥
बहुत मंडळी बरोबरी । कणसें खाया आली खरी । विहिरीपासीं तयारी । केली कणसें भाजण्याची ॥ ८ ॥
विहीर होती धनत्तर । पाणी जिला अपरंपार । गर्द छायेचे वृक्ष थोर । जवळ होते चिंचेचे ॥ ९ ॥
आगट्या पेटल्या एकसरां । अजमासे हो दहा-बारा । तेणे डोंब झाला खरा । गगनोदरी धूमाचा ॥ १० ॥
त्या योगे ऐसे झाले । आग्यामोहोळ लागलेले । चिंचवृक्षावरी भलें । त्याच्या माशा उठल्या की ॥ ११ ॥
त्या माश्या उठतां क्षणीं । मंडळी गेली पळोनी । कणसें ठिकाणच्या ठिकाणी । मक्याची ती राहिली हो ॥ १२ ॥
त्या आग्यामोहोळांच्या मक्षिका । पसरल्या अवघ्या मळ्यांत देखा । घोंगड्यांचा करून बुरखा । कोणी गेले पळून ॥ १३ ॥
प्राणापरी आवडती । वस्तू नसे हो कोणती । अशा वेळी समर्थमूर्ती । आसनी होती निर्धास्त ॥ १४ ॥
ते नाही पळून गेले । आसनी आपल्या स्वस्थ बसले । विचार करू लागले । निज चित्ती माश्यांचा ॥ १५ ॥