पोथी
←

श्री गजानन विजय ग्रंथ

अध्याय ५

अध्याय ५

अध्याय ५

अध्याय पाचवा

श्रीगणेशाय नमः ॥

हे अज-अजित-अद्वया । सच्चिदानंदा करुणालया । दासगणू लागला पाया । आता अभय असूं दे ॥ १ ॥

मी हीन-दीन-पातकी नर । नाही कोणता अधिकार । सर्व बाजूंनी लाचार । आहे मी देव-देवा ॥ २ ॥

परी अत्यंत हीनावरी । थोर सर्वदा कृपा करी । पाहा अंगी लाविली खरी । विभूती श्रीशंकराने ॥ ३ ॥

तो हीनांचा हीनपणा । थोरां न आणी कमीपणा । हे जाणोन नारायणा । गणू हा ठेवा संग्रही ॥ ४ ॥

सर्व लाड लेकरांचे । माता ती पुरवी साचे । आहे दासगणूचे । ओझे सर्व तुझ्या शिरीं ॥ ५ ॥

जैसे करशील तैसे करी । परी दया असूं दे अंतरी । देवा तुझ्या बळावरी । दासगणूच्या साऱ्या उड्या ॥ ६ ॥

गजानन असता शेगांवी । यात्रा येई नित्य नवी । ती कोठवरी वर्णावी ? पार न लागे तियेचा ॥ ७ ॥

महिमा तो वाढला फार । म्हणून गजानन साधूवर । ती उपाधी करण्या दूर । भटकूं लागले काननीं ॥ ८ ॥

महिना-महिना तिकडेच राहावे । वाटेल तेथेच बैसावे । कोणाशी उमगू न द्यावें । चरित्र आपुले येतुलेही ॥ ९ ॥

श्रोते, एका समयासी । महाराज पिंपळगांवासी । गेले तेथे गोष्ट कैसी । झाली ते अवधारा ॥ १० ॥

त्या पिंपळगांवाच्या शिवारांत । होते एक अरण्यांत । शंकराचे मंदिर सत्य । जुने-पुराणे हेमाडपंती ॥ ११ ॥

ऐशा त्या मंदिरी । येते झाले साक्षात्कारी । बैसले शिवाच्या गाभारी । लावोनिया पद्मासन ॥ १२ ॥

गुराखी त्या गांवचे । आपापले कळप गुरांचे । घेऊनिया निघाले साचे । अस्तमानी गांवाकडे ॥ १३ ॥

मंदिरापुढे तत्त्वतां । एक लहान ओढा होता । तेथे पाणी पाजण्या करितां । गुरे गुराखी पातले ॥ १४ ॥

कोणी सहज मंदिरात । गेले वंदण्या शिवाप्रत । तो तेथे पाहोन समर्थ । आश्चर्यचकित जाहले ॥ १५ ॥