पोथी
←

श्री गजानन विजय ग्रंथ

अध्याय ४

अध्याय ४

अध्याय ४

अध्याय चौथा

श्रीगणेशाय नमः ॥

हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा । नीलकंठा गंगाधरा । महांकाल त्र्यंबकेश्वरा । श्रीओंकारा पाव मशी ॥ १ ॥

तूं आणि रुक्मिणीश । एक तत्त्व आहां खास । तोय-वारी म्हटल्यास । काय जलीं भेद होतो ? ॥ २ ॥

तैसी तुमची आहे स्थिती । तंतोतंत जगत्पती । जैसी ज्याची मानेल मती । तैसा तो तुज बाहत ॥ ३ ॥

अनन्यभावें बाहतां । तूं पावसी आपल्या भक्तां । माता न धरी निष्ठुरता । आपल्या वत्साविषयीं कधीं ॥ ४ ॥

मी तुझे अजाण लेकरू । नको माया पातळ करू । तूं साक्षात् कल्पतरू । इच्छा पूर्ण करी हरा ॥ ५ ॥

बंकटलालाचे घरांत । असता स्वामी समर्थ । प्रकार एक अघटीत । आला ऐसा घडोनी ॥ ६ ॥

वैशाख शुद्ध पक्षासी । अक्षय- तृतीयेचिया दिवशीं । पितरार्थ उदककुंभासी । देती श्राद्ध करोनिया ॥ ७ ॥

अक्षयतृतीयेचा दिवस । वऱ्हाडातील लोकांस । विशेष वाटे प्रत्येकांस । मोठा सण मानिती हा ॥ ८ ॥

त्या दिवशीं काय झाले । तें पाहिजे श्रवण केले । महाराज पोरांत बैसले । कौतुकें लीला करावया ॥ ९ ॥

बालकां म्हणती गजानन । चिलीम द्यावी भरून । तंबाखूची मजकारण । विस्तव वरी ठेवोनिया ॥ १० ॥

सकाळपासून ऐसाच बसलों । चिलीम मुळी नाही प्यालो । त्यामुळे हैराण झालों । भरा चिलीम मुलांनों ! ॥ ११ ॥

ऐसी आज्ञा ऐकतां भली । पोरे अवघी आनंदली । चिलीम भरूं लागली । तंबाखू आंत घालुनिया ॥ १२ ॥

विस्तवाचा तपास केला । तो न सदनीं मिळाला । कां की चूल पेटण्याला । अवकाश होता विबुध हो ॥ १३ ॥

पोरे चित्तीं विचार करती । आपापसांत निश्चिती । कशी करावी यासी युक्ती । विस्तव पाहिजे चिलिमीला ॥ १४ ॥

मुले पाहून चिंतातुर । बंकट करी मधुरोत्तर । अरे, जानकीराम सोनार । आहे वेटाळी आपुल्या ॥ १५ ॥