पोथी
←

श्री गजानन विजय ग्रंथ

अध्याय ३

अध्याय ३

अध्याय ३

अध्याय तिसरा

श्रीगणेशाय नमः ॥ जय जय सच्चिदानंदा श्रीहरी । कृपा करावी लौकरी । तुम्ही पदनताच्या वरी । कधीं न कठोर झालात ॥ १ ॥

तूं करूणेचा सागर । तूं दीन जनांचे माहेर । तूं भक्तासी साचार । कल्पतरु वा चिंतामणी ॥ २ ॥

ऐसा तुझा अगाध महिमा । संत गाती राघवा रामा । दासगणूसी पुरुषोत्तमा । पावा वेळ करूं नका ॥ ३ ॥

असो, बंकटलाला घरीं । राहाते झाले साक्षात्कारी । दीन-दुबळ्यांचे कैवारी । श्रीगजानन महाराज ॥ ४ ॥

लांबलांबोनी भक्त येती । समर्थांते वंदिती । मधू तेथे माश्या जमती । न लगे करणें आमंत्रण ॥ ५ ॥

एके दिनी काय झाले । ते आतां सांगतो वहिलें । महाराज होते बसलेले । निजासनीं आनंदात ॥ ६ ॥

ती प्रभातीची होती वेळा । प्राची प्रांत ताम्र झाला । पक्षी किलबिलाटाला । करूं लागलें वृक्षावर ॥ ७ ॥

कुक्कुटाचे होती स्वन । मंद शीत वाहे पवन । वृद्ध करिती नामस्मरण । शय्येवरी बैसोनिया ॥ ८ ॥

उदयाचलीं नारायण । येऊं पाहे हर्षे करून । तेणे तम पलायन । करूं लागला कंदरीसी ॥ ९ ॥

परम भाविक सुवासिनी । रत सडा-संमार्जनीं । वत्स धेनूस पाहोनी । तोडूं लागलीं चऱ्हाटें ॥ १० ॥

ऐशा त्या रम्य वेळेस । एक साधु शेगांवास । येता झाला दर्शनास । श्रीगजानन साधुंच्या ॥ ११ ॥

तो भिकार गोसावी । मानमान्यता त्याची राहावी । कोठोनिया सांगा बरवी । श्रीमंतांच्या मंडळींत ? ॥ १२ ॥

भगवी चिंधी डोक्यास । झोळी वाम बगलेस । होती एक नेसण्यास । फाटकीसी लंगोटी ॥ १३ ॥

मृगाजिनाचा गुंडाळा । पाठीवरी होता भला । ऐसा गोसावी बैसला । कोपऱ्यांत एकीकडे ॥ १४ ॥

दर्शनासी भीड फार । होवो लागली साचार । अशा स्थितीत मिळणार । सवड कशी त्या गोसाव्यास ? ॥ १५ ॥