पोथी
←

श्री गजानन विजय ग्रंथ

अध्याय २१

अध्याय २१

अध्याय २१

अध्याय एकविसावा

श्रीगणेशाय नमः ॥

जयजयाजी अनंतवेषा । जयजयाजी अविनाशा । जयजयाजी परेशा । ब्रह्मांडाधीशा नमो तुशी ॥ १ ॥

देवा ! तूं आपणांस । पतितपावन नाम खास । सर्वदा आहे धरिलेस । याचा विचार करी गा ॥ २ ॥

पाप्यावरीं प्रेम अमित । तुझें देवा असतें सत्य । पापी जनांनी तुजप्रत । महत्त्व आणिलें कृपाळा ॥ ३ ॥

म्हणून माझ्या पातकासी । पाहूं नका हो हृषीकेशी । धुणे येते जलापासीं । स्वच्छ होते म्हणून ॥ ४ ॥

म्हणून, पतितांचा कंटाळा । करूं नको रे घननीळा । काय भूमीने सांवरिला । दिले आहे टाकून ॥ ५ ॥

तूंच पतितपावन । तूंच पुण्यपावन । या दोन्ही दोषांपासून । तुम्ही अलग सर्वदा ॥ ६ ॥

सूर्य नाशी तमाप्रत । म्हणून कां तो कष्टी होत । कांही न करावे लागत । तम नासण्या रवीशीं ॥ ७ ॥

तम जो जों भेटण्या येई । तो तों तेथें प्रकाश होई । अंधारत्व अवघें जाई । त्याचें तमाचें नारायणा ॥ ८ ॥

पाप-पुण्याची वासना । तूंच उपजविशी नारायणा । आपला रक्षण्या मोठेपणा । पापी तूंच निर्मिशी ॥ ९ ॥

कांही असो, आतां तरी । चिंतारहित मजला करी । दासगणू हा घ्यावा पदरीं । हेंच आहे मागणें ॥ १० ॥

तुझ्यावांचून मजप्रत । नाही वशिला जगतांत । अवघेंच तुझ्या हातांत । आहे की रे पांडुरंगा ! ॥ ११ ॥

श्रोते, आतां सावधान । हा कळसाध्याय परिसा पूर्ण । तुमचें भाग्य धन्य धन्य । संतकथा ऐकतसां ॥ १२ ॥

एकविधा निष्ठा ज्याची । जडली गजाननपदीं साची । त्याच्या दुःख-संकटांची । होळीच होते निःसंशय ॥ १३ ॥

बांधीत असतां मंदिर । काम करीत शिखरावर । एक होता मजूर । हाताखाली गवंड्यांच्या ॥ १४ ॥

तो धोंडा देतां मिस्तरीला । एकाएकी झोंक गेला । तीस फुटांवरून पडला । खालीं घडीव दगडावर ॥ १५ ॥