अध्याय २०
श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी रुक्मिणीवरा । हे चंद्रभागा तट-विहारा । देवा वरदपाणी धरा । दासगणूच्या मस्तकी ॥ १ ॥
तू भूपांचा भूपती । अवघेच आहे तुझ्या हातीं । मग माझी फजिती । कां रे ऐसी मांडलीस ? ॥ २ ॥
माझें पाप-ताप दहन । करा कृपाकृशाने करून । राहो आनंदी सदा मन । तुझे भजन करावया ॥ ३ ॥
यांत अंतर केल्यास । वृथा तुला लागेल दोष । खऱ्या थोरांनी आपणांस । बट्टा लावून घेऊ नये ॥ ४ ॥
म्हणून हे श्यामसुंदरा । राही-रुक्मिणीच्या वरा । पांडुरंगा परम उदारा । माझी इच्छा पूर्ण करी ॥ ५ ॥
असो, समाधिस्थ झाल्यावर । श्रीगजानन साधुवर । म्हणूं लागले नारीनर । आतां काय ह्या शेगांवीं ॥ ६ ॥
शेगांवीचा ज्ञानगभस्ती । अस्ता गेला निश्चिती । आता काय तेथे माती । राहिली आहे निव्वळ ॥ ७ ॥
समुद्राचे आटल्या नीर । वा, पुष्पतंरूंचा गेल्या भर । कोण त्याचे करणार । कौतुक या जगामध्ये ? ॥ ८ ॥
आतां खेपा शेगांवात । करणे आहे की निमित्त ? । देव नसतां देव्हाऱ्यांत । माळा बांधणे व्यर्थची ॥ ९ ॥
ऐसें कित्येक बोलती । परी ती असे साच भ्रांती । महाराजांची दिव्य ज्योती । अदृश्य आहे तेच ठायां ॥ १० ॥
जेवीं इंद्रायणीचे तीरीं । ज्ञानेश्वर समाधिस्थ जरी । ते आहेत भेटले परी । तेच ठायीं भाविकां ॥ ११ ॥
तैशीच शेगांवात । श्रीगजाननस्वामी समर्थ । ऐसा जयांचा सिद्धान्त । दर्शन त्यांना तेथ होतें ॥ १२ ॥
ते विषयींची एक कथा । सांगतो मी येथ आतां । गणपत कोठाडे नामे होता । एक भाविक गृहस्थ ॥ १३ ॥
हा रायली कंपनीचा । एजंट शेगांव दुकानीचा । नित्य नेम होता त्याचा । दर्शनाचा श्रोते हो ॥ १४ ॥
अस्तमानीं प्रती दिवशीं । यावें त्याने मठासीं । बैसोनिया समाधीपाशीं । स्तवन करावें एकनिष्ठें ॥ १५ ॥