अध्याय २
श्रीगणेशाय नमः ॥
जयजय अज अजिता सर्वेश्वरा । हे चंद्रभागा तटविहारा । पूर्णब्रह्मा रुक्मिणीवरा । दीनबंधो पाहि माम् ॥ १ ॥
तुझ्या वशिल्यावांचून । अवघेच देवा आहे शीण । कुडीमाजीं नसल्या प्राण । कोण विचारी मढ्यातें ॥ २ ॥
सरोवराची दिव्य शोभा । तोयामुळे पद्मनाभा । रसभरीत आंतला गाभा । टरफलातें महत्त्व आणी ॥ ३ ॥
तुझी कृपा त्याच परी । शरणांगतातें समर्थ करी । पाप-ताप-दैन्य वारी । हेच आहे मागणे ॥ ४ ॥
मागले अध्यायी झालें कथन । समर्थ गेले निघून । तेणें बंकटलाला लागून । हुरहूर वाटूं लागली ॥ ५ ॥
गोड न लागे अन्न-पाणी । समर्थांचा ध्यास मनीं । न हाले दृष्टिपासोनी । गजाननाचे रूप तें ॥ ६ ॥
जिकडे पहावे तिकडे भास । होवो लागला त्यांचा खास । याचें नांव श्रोते ध्यास । उग्या नसती पोरचेष्टा ॥ ७ ॥
चुकलेल्या धेनूची । वत्स शुद्धी करी साची । तैसी बंकटलालाची । स्थिती झाली विबुध हो ॥ ८ ॥
हे हितगुज सांगावया । जागा नव्हती कोठे तया । वडिलांपासीं बोलावया । छाती त्याची होईना ॥ ९ ॥
ऐशा रीती चित्ती भलें । विचाराचें काहूर झाले । शेगांव अवघें धुंडाळिले । परि न पत्ता लागला ॥ १० ॥
घरी येतां वडील पुसती । भवानीराम सन्मती । 'बाळा, तुझी आज वृत्ती । कां रे झाली चंचळ ? ॥ ११ ॥
चित्तीं उत्साह दिसेना । वदनीं दिसे म्लानपणा । ऐशा असह्य यातना । होती कशाच्या सांग मज ! ॥ १२ ॥
तूं पोऱ्या तरणा ज्वान । नाही कशाची तुला वाण । ऐसें साच असोन । चिंतातुर दिसतोसी ॥ १३ ॥
किंवा शरीरी कांही व्याधी । होतसे ती सांग आधीं । चोरून पुत्र ठेवी न कधीं । गोष्ट कोणती पित्याला' ॥ १४ ॥
कांही तरी सांगून । केले पित्याचे समाधान । पुन्हा शोधाकारण । फिरूं लागला शेगांवी ॥ १५ ॥