पोथी
साइन इन

श्री गजानन विजय ग्रंथ

अध्याय १९

अध्याय १९

अध्याय १९

अध्याय एकोणिसावा

श्रीगणेशाय नमः ॥

जयजयाजी आनंदकंदा जयजयाजी अभेदा माझे नमन तुझ्या पदा असो सर्वदा अनन्यभावें

हे राघवा रघुपती पाव आतां शीघ्र गती माझा अंत पाहशी किती ? हे काही कळेना

खऱ्या थोराशी कठोरता नाही शोभत अनंता याचा विचार काही चित्ता करा आपुल्या ये काळीं

मी दीनवाणें मारितो हांका मला दगा देऊं नका हे जगदीशा जगन्नायका पावा दासगणूस

महाराज असतां शेगांवात विप्र एक काशिनाथ जो खंडेरावाचा होय सुत गर्दे उपनांव जयाचें

तो आला दर्शना समर्थांच्या वंदिले चरणां मूर्ती पाहून त्याच्या मना आनंद झाला अतिशय

माझ्या सन्माननीय वडिलानें जी जीवन्मुक्ताचीं लक्षणें लिहिली अनुभवानें त्याची प्रत्यक्ष मूर्ती ही

माझे भाग्य धन्य धन्य म्हणून हें पाहण्या चरण आलों खामगांवाहून त्याचें सार्थक झालें की

तो समर्थांनीं लीला केली कोपरखिळी मारली काशिनाथाच्या पाठीस भली आपुल्या परमकृपेनें

जा तुझा हेतू पुरला वाट पाहे तारवाला या भाषणें घोटाळला काशिनाथ मानसी १०

म्हणे काम ना माझे ये ठाईं मी न आलों मागण्या कांहीं तारवाला शिपाई वाट पहातो काय हें ? ११

त्याचें गूढ कळेना पुसण्या छाती होईना निमुटपणें वंदून चरणा गेला निघून खामगांवीं १२

तों तारवाला शिपाई उभा दारांत होता पाही तार घेतली घाई-घाई कशाची ती बघण्यास १३

तारेंत हा मजकूर तुमचा केला तक्रूर मुनसफीच्या हुद्द्यावर मोर्शी तालुक्याकारणें १४

ते पाहतां आनंदला कोपरखिळीचा अर्थ कळला त्या काशिनाथपंताला पहा संतांचें ज्ञान कैसें ? १५