अध्याय १८
श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी चिद्विलासा । हे गोविंदा श्रीनिवासा । हे आनंदकंदा परेशा । पाहि माम् दीनबंधो ॥ १ ॥
हे केशवा केशीमर्दना । हे माधवा मधुसूदना । हे पूतनाप्राणशोषणा । पांडुरंगा रुक्मिणीपते ॥ २ ॥
काय माझ्या आहे मनी । ते तूं जाणसी चक्रपाणी । तेच कां रे तुजलागुनी । बोलून दावूं पद्मनाभा ॥ ३ ॥
भक्त जी जी इच्छा करी । ती ती तूं पुरविसी श्रीहरी । ऐसे पुराणाभीतरीं । आहे वर्णन बहुसाळ ॥ ४ ॥
म्हणून माझ्या मनोरथा । पूर्ण करा पंढरीनाथा । सोडा मनीची कठोरता । दासगणू हा तुझा असे ॥ ५ ॥
आकोटाचे शेजारी । मुंडगांव नामें एक नगरी । तेथें बायजा नामें खरी । समर्थांची भक्तीण असे ॥ ६ ॥
हळदी माळ्याच्या वंशांत । इचा जन्म झाला सत्य । शिवराम नामें इचा तात । भुलाबाई जननी असे ॥ ७ ॥
बायजाचे बाळपणीं । लग्न झाले होतें जाणी । ललाटी जे विधात्यांनीं । लिहिले असेल तेंच घडे ॥ ८ ॥
बायजा आली तारुण्यांत । गर्भाधान करण्याप्रत । घेऊन गेला तिचा तात । जामाताच्या गृहासी ॥ ९ ॥
परी उपयोग नाहीं झाला । जामात षंढ होता भला । तेणें जनक-जननीला । शोक झाला अनावर ॥ १० ॥
बायजेकडे पाहून । जननी करी रोदन । माझ्या बाईचे तारुण्य । वांझ पाहूं रहातें ॥ ११ ॥
भुली म्हणे शिवरामासी । बायजा न ठेवा ऐशी । दुसरा नवरा करुन इसी । देणें आहे भाग पाहा ॥ १२ ॥
शिवराम म्हणे त्यावर । ऐसा नको सोडूं धीर । हा पुरुषत्वाचा प्रकार । खरा एकदम कळेना ॥ १३ ॥
काहीं दिवस वाट पाहूं । नको ऐसी अधीर होऊं । बायजासी येथेंच ठेवूं । तिच्या सासुरवाडीला ॥ १४ ॥
नपुंसकत्व अधोपरी । आले असेल त्याला जरी । तें औषधाने होईल दुरी । वाट पाही यास्तव ॥ १५ ॥