पोथी
←

श्री गजानन विजय ग्रंथ

अध्याय १७

अध्याय १७

अध्याय १७

अध्याय सतरावा

श्रीगणेशाय नमः ॥

जयजयाजी महामंगला । जयजयाजी भक्तपाला । जयजयाजी तमालनीला । पतितपावन नरहरे ॥ १ ॥

हिरण्यकश्यपू महाक्रूर । सज्जनांचा शत्रू थोर । तयाचे तूं फाडून उदर । मरण त्याचे साधिलें ॥ २ ॥

प्रल्हाद रक्षणासाठी । तू जन्मलास स्तंभापोटी । रूप अनुपम जगजेठी । धारण ते करून ॥ ३ ॥

दात-दाढा भयंकर । आयाळ रुळे मानेवर । नेत्र जेवीं खदिरांगार । ब्रह्मांड जाळू पाहती ॥ ४ ॥

त्या भयंकर रूपाची । भीति नसें भक्ता साची । पिलें जेवीं वाघिणीची । अंगावर खेळती तिच्या ॥ ५ ॥

तुम्हां पाहून देवराया । लक्ष्मी न धजे पुढें यावया । ऐशा स्थितीत लागला पाया । भक्त तुझा नरहरे ॥ ६ ॥

तूं भक्तवत्सल लक्ष्मीकांत । ऐसें सांगत आलें संत । पुरविशी भक्त मनोरथ । नाही नं त्यासी म्हणसी कदा ॥ ७ ॥

त्या आपुल्या ब्रीदासी । जाग आतां हृषीकेशी । दासगणू लागला पायांसी । अभय असू दे पांडुरंगा ॥ ८ ॥

गजाननाचे परमभक्त । होते काही अकोल्यांत । तयांचिया सदनाप्रत । हमेशा यावें समर्थानीं ॥ ९ ॥

चापडगांवचे बापू कृष्ण । खटाऊ शेटाचें कुटुंब जाण । गोंडुलालाचा नंदन । बच्चुलाल नाम ज्यांचें ॥ १० ॥

जीजीबाई पंडित । आणीकही होते बहुत । त्यांची नांवे तुम्हांप्रत । किती सांगू विबुध हो ॥ ११ ॥

एके वेळीं अकोल्यांत । आले गजाननस्वामी समर्थ । खटाऊच्या गिरणींत । मुक्काम त्यांनी ठेविला ॥ १२ ॥

एक भक्त मलकापुरी । विष्णुसा नामें निर्धारी । त्याच्या वाटलें अंतरीं । समर्थ आणावें मलकापुरा ॥ १३ ॥

त्याने आमंत्रणाचा वशिला । भास्कराच्या द्वारे लाविला । हाच भास्कर होता झाला । समाधिस्थ अडगांवी ॥ १४ ॥

तो त्या वेळी होता जवळ । करी कारभार अंगे सकळ । विष्णुसाला होते बळ । याच भास्कर पाटलाचे ॥ १५ ॥