पोथी
←

श्री गजानन विजय ग्रंथ

अध्याय १६

अध्याय १६

अध्याय १६

अध्याय सोळावा

श्रीगणेशाय नमः ॥

जयजयाजी परशुधरा । हे जमदग्नीच्या कुमारा । परशुरामा परमेश्वरा । आता उपेक्षा करूं नको ॥ १ ॥

तू सहस्त्रर्जुनाते दंडून । केले द्विजांचे संरक्षण । ब्राह्मणाचा अपमान । सहन झाला नाहीं तुला ॥ २ ॥

आतां मात्र डोळे मिटिसी । कां रे देवा ब्राह्मणांविशी ? । काय आहे लागली तुसी । गाढ निद्रा येधवां ॥ ३ ॥

म्हणून डोळे मिटू नका । स्वस्थ ऐसे बसू नका । आणिबाणीचा प्रसंग देखा । आहे हरी सांप्रत ॥ ४ ॥

तुझ्या वशिल्यावांचून । अवघी कृत्यें आहेत शीण । आर्यसंस्कृतीचें रक्षण । होणें नाही तुझ्याविण ॥ ५ ॥

गजाननमाया अघटित । कोण जाणे तिजप्रत । महाराजांचा एक भक्त । पुंडलीक नामें मुंडगांवी ॥ ६ ॥

हा शेगांवची करी वारी । समर्थांविषयीं प्रेम भारी । हमेशा त्यांचे चिंतन करी । एकाग्रशा मनाने ॥ ७ ॥

त्याच गांवी भागाबाई । एक ठाकरीण होती पाही । निष्ठा तिची एक्याही । ठिकाणासी बसत नसे ॥ ८ ॥

ती दांभिक होती फार । सदा दंभाचा बाजार । भरवून भोंदी नारी-नर । हाच धंदा तियेचा ॥ ९ ॥

ती बोलली पुंडलीकाला । तुझा जन्म वाया गेला । का की तूं नाही केला । सद्गुरु तो आपणातें ॥ १० ॥

गजाननाच्या वाऱ्या करिसी । सद्गुरु त्याला मानिसी । परी त्याने सांग तुसी । मंत्र कानीं कथिला कां ? ॥ ११ ॥

अरे, विधीवाचून । गुरु न होत कधी जाण । शेगांवचा गजानन । वेडापिसा साच असे ॥ १२ ॥

तुझा ताप बरा झाला । म्हणून तूं मानिसी त्याला । या ‘काकतालीय’ न्यायाला । बळी पुंडलीका पडूं नको ॥ १३ ॥

‘गिन गिन गणातें’ हे भजन । पिशापरी आचरण । कोणाचेही खाई जाण । ऐसा मुळी भ्रष्ट तो ॥ १४ ॥

म्हणून तुला सांगते । चाल अंजनगांवाते । केजाजीच्या शिष्यातें । आपण दोघे गुरु करूं ॥ १५ ॥