पोथी
←

श्री गजानन विजय ग्रंथ

अध्याय १५

अध्याय १५

अध्याय १५

अध्याय पंधरावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

हे कश्यपात्मज वामना । हे बटुरूपधारी नारायणा । तूं बळीच्या घेऊनी दाना । कृतार्थ त्याला केलेंस ॥ १ ॥

राज्य मृत्युलोकीचे । घेतले त्वां जरी साचें । तरी दिलें पाताळाचें । राज्य बलीकारणें ॥ २ ॥

आंवळा घेऊन नारळ दिला । तुम्ही त्या पुण्यवंत बलीला । आणि त्याच्या भक्तीस्तव झाला । द्वारपाल द्वारीं तुम्ही ॥ ३ ॥

या मन्वन्तरानंतर । बलीच आहे होणार । देवांचा राजराजेश्वर । देवा, तुझ्या वरानें ॥ ४ ॥

एका घटकेत अनंता । चहू वेदांच्या संहिता । पठण केल्या बुद्धीमत्ता । केवढी तुझी अगाध तरी! ॥ ५ ॥

अवघ्यां तुझ्या अवतारी । हा सोवळा अवतार श्रीहरी । कोणाचाही भूमीवरी । वध तुम्हीं न केलांत ॥ ६ ॥

शत्रुमित्रांच्या घरी दिवा । ये अवतारी लाविला बरवा । देव आणि दानवा । तूं वंद्य सारखाच ॥ ७ ॥

देव तेही आनंदविले । राक्षस तेही रक्षिले । आपलें ईशत्व सांभाळिले । याच अवतारी देवा तूं ॥ ८ ॥

तुला माझा नमस्कार । असो वामना वारंवार । मस्तकी ठेवा वरदकर । तुम्ही दासगणूच्या ॥ ९ ॥

टिळक बाळ गंगाधर । महाराष्ट्राचा कोहिनूर । दूरदृष्टिचा सागर । राजकारणीं प्रवीण जो ॥ १० ॥

निज स्वातंत्र्यासाठी । ज्याने केल्या अनंत खटपटी । ज्याची धडाडी असे मोठी । काय वर्णन तिचें करूं ? ॥ ११ ॥

करारी भीष्मासमान । आर्य महीचे पाहून दैन्य । सतीचे झाला घेता वाण । भीड न सत्यांत कोणाची ॥ १२ ॥

वाक्चातुर्य जयाचे । बृहस्पतीच्या समान साचें । धाबे दणाणें इंग्रजांचे । पाहून ज्याच्या लेखाला ॥ १३ ॥

कृती करून मिळविली । ज्याने 'लोकमान्य' ही पदवी भली । ती न त्यांना कोणी दिली । ऐसा होता बहाद्दर ॥ १४ ॥

तो एके वेळी अकोल्याला । शिवजयंतीच्या उत्सवाला । लोकाग्रहें येतां झाला । व्याख्यान द्याया कारणें ॥ १५ ॥