पोथी
←

श्री गजानन विजय ग्रंथ

अध्याय १४

अध्याय १४

अध्याय १४

अध्याय चौदावा

श्रीगणेशाय नमः ॥

हे कौशल्यात्मज रामराया । हे रघुकुलभूषणा करुणालया । सीतापते करा दया । आतां या लेंकरासी ॥ १ ॥

त्राटिकां त्वां उद्धरली । अहिल्या शिळा सजीव केली । शबरीची पुरविली । इच्छा तूं दाशरथें ॥ २ ॥

भक्तरक्षणा कारण । सोडिलें नृपसिंहासन । वानर केलेस बलवान । केवळ आपुल्या कृपेने ॥ ३ ॥

शिळा तरल्या सागरी । तुझ्या नामें रावणारी । बसविलास गादीवरीं । भक्त आपला बिभीषण ॥ ४ ॥

जो जो आला शरण पदा । तुझ्या की हें आनंदकंदा । दैन्य-दुःख-आपदा । त्याच्या, त्वां वारिल्यास ॥ ५ ॥

हे मनी आणावें । दासगणूस सांभाळावें । बालकानें धावावें । जननिविण कोणाकडे ? ॥ ६ ॥

तूं जननी जनिता सद्गुरु । तूं भक्तांना कल्पतरु । भवनदीचें भव्य तारूं । तूंच की रे रामराया ! ॥ ७ ॥

एक खेर्डेगांवचा । रहिवासी मेहकर तालुक्याचा । बंडूतात्या नांवाचा । ब्राह्मण होता विबुध हो ॥ ८ ॥

हा बंडूतात्या ब्राह्मण । सदाचार संपन्न । उदार होते ज्याचें मन । गृहस्थाश्रम चालवी ॥ ९ ॥

श्रोते, या प्रपंचात । संकटे येती अतोनात । परी नाहीं पहा सुटत । लोभ त्याचा मानवा ॥ १० ॥

या बंडूतात्या घरीं । पाहुणे येती वरच्यावरी । तों अवघ्यांची साच करी । सरबराई निजांगे ॥ ११ ॥

ऐसा क्रम चालला । संचय अवघा संपला । आली पाळी बिचाऱ्याला । कर्ज काढणे साहूचें ॥ १२ ॥

घरदार पडलें गहाण । अगणित झाले तया ऋण । लोकांप्रती दावण्या वदन । लाज वाटूं लागली ॥ १३ ॥

विकावया न कांहीं उरले । सदन अवघे साफ झाले । भांडेकुंडे ते ही गेलें । काय विपत्ती वर्णावी ? ॥ १४ ॥

तगादे करिती सावकार । शिपाई धाडून वरच्यावर । भागवण्यासी दोन प्रहर । अडचण पडूं लागली ॥ १५ ॥