पोथी
←

श्री गजानन विजय ग्रंथ

अध्याय १३

अध्याय १३

अध्याय १३

अध्याय तेरावा

श्रीगणेशाय नमः ॥

हे संतवरदा श्रीधरा । हे दयेच्या सागरा । हे गोपगोपीप्रियकरा । तमालनीळा पाव हरी ॥ १ ॥

तुझे ईशत्व पाहण्याकरितां । जेव्हां झाला विधाता । गाई-वासरे चोरिता । यमुनातटी गोकुळांत ॥ २ ॥

तेव्हा तू निजलीलेंकरून । गाई-वासरे होऊन । ब्रह्मदेवाकारण । आपले ईशत्व दाविले ॥ ३ ॥

दुष्ट ऐशा कालियाला । यमुनेमाजी तुडवून भला । रमणक द्वीपा धाडिला । गोप निर्भय करण्यास ॥ ४ ॥

तेवीं माझ्या दुर्दैवा । तुडवूनीया वासुदेवा । दासगणू हा करावा । निर्भय सर्व बाजूंनी ॥ ५ ॥

मी अजाण भक्त तुझा हरी । परी देवा कृपा करी । मी आहे अनधिकारी । योग्य न तुझ्या कृपेस ॥ ६ ॥

ऐसे जरी आहे सत्य । परी नको पाहूंस अंत । माझी चिंता वार त्वरित । आपुल्या कृपाकटाक्षें ॥ ७ ॥

आतां श्रोते सावधान । बंकट-हरी-लक्ष्मण । विठू-जगदेवादि मिळून । गेले वर्गणी जमवावया ॥ ८ ॥

भाविकांनी वर्गणी दिली । कुत्सितांनी कुटाळी केली । वर्गणीची कां हो पडली । जरूर तुमच्या साधूस्तव ॥ ९ ॥

गजानन म्हणतां महासंत । जें न घडे तें घडवीत । मग त्यांच्या मठाप्रत । वर्गणी ही कशाला ? ॥ १० ॥

कुबेर त्यांचा भांडारी । मग कशास फिरता दारोदारी ? । चिठ्ठी कुबेराच्या वरी । करा, म्हणजे काम झालें ॥ ११ ॥

ऐसे ऐकता भाषण । जगदेव बोलला हांसोन । या भिक्षेचें कारण । आहे तुमच्या बऱ्यासाठी ॥ १२ ॥

श्रीगजाननासाठीं । नको बांधणे मठ-मठी । ह्या अवघ्या आटाआटी । तुमचे कल्याण व्हावयास ॥ १३ ॥

स्वामी गजाननाचा । त्रैलोक्य हाचि मठ साचा । अवघी वनें हा बगीचा । पलंग ज्याचा मेदिनी ॥ १४ ॥

अष्टसिद्धी दासीपरी । राबताती ज्याच्या घरीं । तो न तुमची पर्वा करी । त्याचे वैभव निराळे ॥ १५ ॥