पोथी
←

श्री गजानन विजय ग्रंथ

अध्याय १२

अध्याय १२

अध्याय १२

अध्याय बारावा

श्रीगणेशाय नमः ॥

हे गणाधीशा गणपती । मयुरेश्वरा विमलकीर्ती । माझ्या हृदयी करून वस्ती । ग्रंथ कळसांस नेई हा ॥ १ ॥

तूं ज्ञानबुद्धीचा दाता । तूं भक्तमनोरथ पुरविता । विघ्न नगातें संहारिता । तूंच एक गणराया ॥ २ ॥

तूं साक्षात् चिंतामणी । चिंतिलेलें देशी जाणीं । आपुल्या भक्तांलागूनी । ऐसें पुराणें म्हणतात ॥ ३ ॥

माझ्या मनीची अवघी चिंता । लयास नेई एकदंता । लंबोदरा पार्वतीसुता । भालचंद्रा सिंदुरारे ॥ ४ ॥

असो, बच्चुलाल अग्रवाला । होता एक अकोल्याला । धन-कनक संपन्न भला । मनाचाही उदार जो ॥ ५ ॥

त्याने हकिकत कारंज्याची । म्हणजे लक्ष्मणपंत घुड्याची । कर्णोपकर्णी ऐकिली साची । तेणें साशंक जाहला ॥ ६ ॥

ते खरे खोटे पहाण्यास । विचार करी चित्तास । तो एके समयास । महाराज आले अकोल्याला ॥ ७ ॥

येऊन बच्चुलाला घरीं । बैसते झाले ओट्यावरी । की गजानन साक्षात्कारीं । भक्त आपुला जाणून ॥ ८ ॥

बच्चुलाला आनंद झाला । तो समर्थांसी ऐसे वदला । आज गुरुराया वाटते मला । आपली पूजा करावी ॥ ९ ॥

ऐसें ऐकतां भाषण । समर्थे तुकविलीं मान । जें साक्षात् असे चिन्ह । श्रोते संमती दिल्याचें ॥ १० ॥

बच्चुलालानें तयारी । तात्काळ केली ओट्यावरी । षोडशोपचारे अत्यादरीं । पूजन त्यानें आरंभिले ॥ ११ ॥

प्रथमतः घातलें मंगल स्नान । नानाविध उटणीं लावून । मग करविलें परिधान । वस्त्र पितांबर जरीचा ॥ १२ ॥

शालजोडी अंगावरीं । बहुमोल घातली काश्मिरी । एक जरीचा रुमाल शिरी । अभ्रेस्मि आणूनी बांधिला ॥ १३ ॥

गोफ घातिला गळ्यांत । सलकडी ती हातांत । करांच्या दाही बोटांत । मुद्रिका घातल्या नानापरी ॥ १४ ॥

बहुमोल हिऱ्याची । वामकरी घातली पौची । रत्नजडीत कंठ्याची । कंठीं शोभा विशेष ॥ १५ ॥