पोथी
साइन इन

श्री गजानन विजय ग्रंथ

अध्याय १०

अध्याय १०

अध्याय १०

अध्याय दहावा

श्रीगणेशाय नमः ॥

हे अरुपा अव्यया पूर्णब्रह्मा पंढरीराया सज्जनांच्या विसाविया मजला परते लोटूं नको

हे अरुपा अव्यया पूर्णब्रह्मा पंढरीराया सज्जनांच्या विसाविया मजला परते लोटूं नको

देवा हा दासगणू नको परक्याचा आतां म्हणू माझ्या पातकांचा नको आणूं विचार चित्ती नारायणा

माझ्या करे न झाले पुण्य हे ठाऊकें मजलागून फार काय तुला वदन दावण्या मी योग्य नसे

ऐशी स्थिती आहे जरी परि देवा कृपा करी ओहळास गोदावरी पोटी आपल्या घेतसे

तैसे तुवा करावे दुःख अवघे निवारावे पातकाला न उरू द्यावे माझ्या ठायी यत्किंचित

तू आणिल्या मनांत अवघेंच कांही घडून येत रंकाचाही राव होत तुझा लाधतां वशिला

असो, एकदा पुण्यराशी गेले उमरावतीसी जाऊन उतरले सदनासी आत्माराम भिकाजीच्या

हा आत्माराम भिकाजी सुत उमरावतीचा असे प्रांत मोठा अधिकार हातांत होता त्याच्या विबुध हो

कायस्थ प्रभू याची जात हा संताचा प्रेमी अमित सदाचारसंपन्न गृहस्थ गृहस्थाश्रमी वर्ततसे १०

त्याच्या घरीं समर्थ गेले ते त्याने सांग पूजिले मंगलस्नान घातले उष्णोदकाने गजानना ११

उटणीं नाना प्रकारची अंगा लाविली साची वृत्ती आनंदली त्याची संतसहवासे तेधवां १२

कर्वतीकांठी उमरेडचा धोतरजोडा नेसविला साचा भाली केशरी गंधाचा भव्य तिलक लाविलासे १३

कंठामाजी पुष्पहार नैवेद्याचे नाना प्रकार दक्षिणेंसी शंभर रुपये त्याने ठेविलें १४

धूप-दीप-आरती झाली पुष्पांजली समर्पिली दर्शनालागी दाटी झाली उमरावतीच्या लोकांची १५