पोथी
←

श्री गजानन विजय ग्रंथ

अध्याय १

अध्याय १

अध्याय १

अध्याय पहिला

श्रीगणेशाय नमः ॥

जयजयाजी उदारकीर्ती । जयजयाजी प्रतापज्योती । जयजयाजी हे गणपती ! गौरीपुत्रा मयूरेश्वरा ! ॥ १ ॥

कार्यारंभी तुझें स्मरण । करित आले जन । मोठमोठाले विद्वान । साधुसंत सत्पुरुष ॥ २ ॥

तुझ्या कृपेची अगाध शक्ती । विघ्ने अवघी भस्म होती । कापुसाचा पाड किती । अग्नीपुढें दयाघना ! ॥ ३ ॥

म्हणून आदरें वंदना । करीतसे मी तुझ्या चरणा । सुरस करवी पद्यरचना । दासगणूच्या मुखानें ॥ ४ ॥

मी अज्ञान मंदमती । नाहीं काव्यव्युत्पत्ती । परी तूं वास केल्या चित्तीं । कार्य माझे होईल हे ॥ ५ ॥

आतां आदिमाया सरस्वती । जी ब्रह्माची होय प्रकृती । जी कविवरांची ध्येयमूर्ती । ब्रह्मकुमारी शारदा ॥ ६ ॥

त्या जगदंबेकारण । असो माझे साष्टांग नमन । मी लेकरू आहे अजाण । अभिमान माझा धरावा ॥ ७ ॥

तुझ्या कृपेची अगाध थोरी । पांगळाही चढे गिरी । मुका सभेमाझारीं । देई व्याख्यान अस्खलित ॥ ८ ॥

त्या तुझ्या कीर्तीला । कमीपणा न आणी भला । साह्य दासगणूला । ग्रंथरचनेस करी या ॥ ९ ॥

आतां हे पुराणपुरुषा । पांडुरंगा पंढरीशा । सच्चिदानंदा रमेशा । 'पाहि माम्' दीनबंधो ॥ १० ॥

तूं सर्वसाक्षी जगदाधार । तूं व्यापक चराचर । कर्ता करविता सर्वेश्वर । अवघे कांही तूंच तू ॥ ११ ॥

जग, जन आणि जनार्दन । तूंच एक परिपूर्ण । सगुण आणि निर्गुण । तूंच की रे मायबापा ॥ १२ ॥

ऐसा तुझा अगाध महिमा । जो न कळे निगमागमा । तेथे काय पुरुषोत्तमा । या गणूचा पाड असे ॥ १३ ॥

रामकृपा जेव्हां झाली । तेव्हा माकडां शक्ती आली । गोप तेही बनलें बली । यमुनातीरी गोकुळात ॥ १४ ॥

तुझी कृपा व्हाया जाण । नाहीं धनाचे प्रयोजन । चरणी होता अनन्य । तूं त्याते साह्य करिशी ॥ १५ ॥