पोथी
←

शंकराची आरती - लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा

शंकराची आरती - लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥ १ ॥

लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ २ ॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ जय देव जय देव ॥ ३ ॥

कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥ ४ ॥

विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ ५ ॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ जय देव जय देव ॥ ६ ॥

देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥ ७ ॥

तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ ८ ॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ जय देव जय देव ॥ ९ ॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥ १० ॥

शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ ११ ॥

जय देव जय देव जय श्रीशंकरा ।आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ जय देव जय देव ॥ १२ ॥

तुमचे वाचन सोबत ठेवा

साइन इन केल्यावर सर्व उपकरणांवर वाचनाची जागा जतन होते, भावार्थ पाहता येतो, रोजचे वाचन नोंदवता येते आणि निवडलेली स्मरणे मिळतात.